छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातून निवृत झालेल्या कनिष्ठ सहायकाने एजंटगिरी सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बांधकाम विभागातून निघणार्या शासकीय कामाची गुत्तेदारी मिळण्यासाठी लागणारे नोंदणी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी त्याने दोघांकडून १० हजार रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. २५) त्याला अटक केली. नंदकिशोर आसाराम चव्हाण (६१) रा. नौकार यश हौसिंग सोसायटी, पोलीस कॉलनी, पडेगाव) असे अटक केलेल्या सेवानिवृत्त कनिष्ठ सहायकाचे नाव आहे.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी २०२३ मध्ये नंदकिशोर चव्हाण सेवानिवृत्त झाला. त्याने तक्रारदार व त्याच्या मित्राला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून निघणार्या शासकीय कामांची ठेकेदारी मिळण्यासाठी लागणारे लायसन काढून देण्यासाठी प्रत्येकी ७ हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार येताच लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता तडजोडीअंती प्रत्येकी ५ हजार रुपये असे एकूण १० हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून जि.प.च्या गेटसमोर सापळा रचला. पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, अंमलदार राजेंद्र नंदिले, सचिन बारमे, रामेश्वर ताठे यांच्या पथकाने नंदकिशोर चव्हाणला १० हजार रुपये लाच घेताना अटक केली. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण करीत आहेत.









